गर्भवती महिलेने ग्रहण न पाळल्याने खरंच जन्मताच बाळामध्ये व्यंगत्व येते का? वाचा काय आहे वास्तव...
खरंच गर्भवती महिलेने ग्रहण न पाळल्याने जन्मताच बाळामध्ये व्यंगत्व येते का?
- श्वेता ढेंबरे
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी सर्वात आधी गर्भाशयात बाळाची वाढ कशी होते हे समजून घेऊयात.
पहिला टप्पा: गर्भधारणा कशी होते?
स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक संबंध झाल्यावर पुरुष बीज म्हणजेच शुक्राणू योनीमार्फत स्त्री बीजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. जर त्याक्षणी स्त्री बीज फेलोपियन ट्यूबमध्ये असेल आणि पुरुष बीज तिथे पोहोचू शकले, तर ते अंडे फलित होऊ शकते व गर्भधारणा होते. एकाच वेळी लाखो शुक्राणू स्त्री बीजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. या लाखो शुक्राणूंमध्ये स्त्री अंडे फलित करायची जणू शर्यतच सुरु असते. परंतु लाखो शुक्राणूंपैकी एकच शुक्राणू अंडाशयचे बाहेरचे कवच भेदून आत जातो. जेव्हा शुक्राणू (पुरुष बीज) अंडाशयात (स्त्री बीजामध्ये) प्रवेश करतो, तेव्हा ते अंडे फलित होते, म्हणजेच गर्भधारणा होते.
दुसरा टप्पा: झायगोट निर्मिती
शुक्राणू आणि अंडे यांच्यात प्रत्येकी २३ क्रोमोझोम्स असतात ज्यामध्ये सर्व जनुकीय माहिती साठवलेली असते. स्त्री बीजामधील २३ क्रोमोझोम आणि पुरुष बीजातील २३ क्रोमोझोम यांच्या जोड्या मिळून एकूण ४६ क्रोमोझोम होतात. या जोड्यांपासून नवीन बाळाचा DNA तयार होतो. ते एकत्रित मिळून बाळाची पहिली पेशी तयार होते. या पेशीला झायगोट म्हणतात.
तिसरा टप्पा: ब्लास्टोसिस्ट निर्मिती
झायगोट पेशीचे विभाजन होते. एका पेशीचे दोन पेशींत विभाजन होते. पुढे दोन पेशींचे चार, चार पेशींचे ८ आणि आठ पेशींचे १६ पेशींमध्ये विभाजन होते. असेच पेशींचे विभाजन होऊन विभाजित पेशींचा समूह तयार होतो. त्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात.
ब्लास्टोसिस्ट फेलोपिअन नलिकेद्वारे अंडवाहिकेद्वारा गर्भाशयात प्रवेश करतो. अंडे फलित झालेल्या सहाव्या दिवशी ब्लास्टोसिस्ट गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतो व तिथे त्याची वाढ होऊ लागते. ब्लास्टोसिस्टच्या आतल्या पेशीपासून गर्भ तयार होतो आणि बाहेरच्या पेशीपासून नाळ तयार होते. या नाळेतून बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक आईद्वारे बाळापर्यंत पोहोचतात.
गर्भधारणा ते ब्लास्टोसिस्ट तयार होण्यापर्यंतचा सफर पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. https://youtu.be/DGyRD9HnXVsस्त्री प्रजनन तंत्र
छायााचित्र सौजन्य -गर्भ राहिल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांनी बाळाचे अवयव तयार होऊ लागतात.
चौथ्या ते आठव्या आठवड्यात बाळाच्या चेहऱ्याचा विकास होतो. चेहऱ्याचा विकास ही खूप गुंतागुंतीची प्रोसेस आहे. यामध्ये frontonasal process, a pair of maxillary process and mandibular process या पाच प्रोसेसचा समावेश असतो. frontonasal process यामध्ये गर्भाच्या मेंदूचा पुढील भाग तयार होण्यासाठी वरच्या बाजूला विशिष्ठ ऊतींचा फुगवटा येतो. A pair of maxillary process द्वारे जबड्याचा वरचा भाग आणि गाल तयार होतात. mandibular process द्वारे जबड्याचा खालचा भाग तयार होतो. मध्य आणि बाजूच्या नाकाच्या प्रक्रियेद्वारे नाक तयार होते परंतु ही प्रक्रिया फारच गुंतागुंतीची असते. एकाचवेळी वरून, बाजूने, खालून आणि मध्यभागातून दोन किंवा अधिक तुकडे एकेमकांपासून वेगळे होऊन आणि एकमेकांस जोडले जाऊन त्यापासून चेहरा तयार होतो. संपूर्ण चेहरा विकसित व्हायला आठ आठवडे लागतात. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची तर आहेच शिवाय ती यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध घटकांत सुसूत्रता आवश्यक आहे. या प्रक्रियेत थोडी गडबड झाली तर ओठ फाटणे किंवा टाळू फाटणे असे व्यंग गर्भात तयार होते.
चेहऱ्याचा विकास कसा होतो हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
नवव्या आठवड्यात गर्भ १.५ इंचाचा होतो. नवव्या आठवड्यात गर्भाला हात आणि पाय विकसित होऊ लागतात. अशाप्रकारे गर्भाला तीन महिने पूर्ण होईपर्यंत सर्व अवयव तयार झालेले असतात. तीन महिण्याच्या गर्भाला मिनी मानव म्हणतात. कारण तीन महिन्यापर्यंत गर्भाची ६०% वाढ पूर्ण झालेली असते. त्यानंतरच्या कालावधीत गर्भाची वाढ होत राहते. म्हणून याचदरम्यान गर्भात एखादा मोठा दोष होण्याची शक्यता जास्त असते. तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये गर्भात झालेले दोष समजतात. दुसऱ्या आठवड्यापासून आठ आठवड्यापर्यंत जन्मतःच बाळामध्ये दोष होण्याची जोखीम सर्वाधिक असते.
प्रत्येक आठवड्यात होणारा बाळाचा विकास समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा. https://youtu.be/EhUOkTPW7L0
पूर्वी चेहऱ्याचा विकास नीट झालेला नसेल, त्याचा ओठ किंवा टाळू फाटलेली असेल, बाळाच्या डोक्याला कवटी नसेल, पोटातून आतडे बाहेर आलेले असेल तर त्या बाळाला *राक्षस* हे नाव द्यायचे. आज तंत्रज्ञानाच्या विकासाने आपण तिसऱ्या महिन्यातच बाळाच्या विकासातील दोष जाणून घेऊ शकतो आणि गर्भपात करता येतो त्यामुळे अशा बाळांच्या जन्माचे प्रमाण कमी झालेले आहे.
बाळाला जन्मतः व्यंगत्व असण्याची कारणे:
गरोदरपणात आईला मधुमेह आजार असणे: जर गरोदरपणाआधी आईला मधुमेह (diabetic) हा आजार असेल आणि गरोदर असताना तिच्यात साखरेचे प्रमाण अधिक असेल तर बाळाचा ओठ किंवा टाळू फाटू शकते.
गरोदर माता दारू, तंबाखू आणि सिगारेट इत्यादींचे व्यसन करत असतील तर .... आई गरोदरपणात तंबाखू, दारू, सिगारेट याचं एव्यासन करत असेल तरीही व्यंग असणारी बाळे जन्मू शकतात.
आईच्या आहारात पोषण घटकांची कमरता असल्यास: आईचा आहार व्यवस्थित नसेल तिच्यात बी १२ जीवनसत्व आणि फॉलिक आम्लची कमतरता असेल तरीही व्यंग असणारे बाळ जन्मते.
गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध सेवन केल्यास: आईने गरोदरपणात घेतेलेल्या काही औषधांचा बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होतो. उदा. उलट्या आणि मायग्रेन यावर घेण्यात येणाऱ्या थॅलिडोमायडीन या औषधामुळे जर्मनीत १९६२ मध्ये अतिशय लहान हात - पाय विकसित झालेली बाळे जन्मली. त्यावेळी जगभरात १०००० अशी बाळे जन्मली त्यातील फक्त ५०% बाळे जगू शकली. यानंतर मात्र औषध निर्मिती कंपीनीच्या कायद्यातच बदल झाला. तेव्हापासून कोणत्याही औषधाचा आधी उंदरावर प्रयोग होऊ लागला नंतर ते गर्भवती महिलेसाठी सुरक्षित आहे की नाही याचा अभ्यास करण्यात येऊ लागला त्यानंतरच ते मार्केटमध्ये विकण्यात येत असे.
जंतुसंसर्गामुळे येणारे व्यंग:आई गर्भवती असताना जर तिला जंतुसंसर्ग झाला तरीही गर्भाचा विकास नीट होत नाही. उदा. रुबेला विषाणूमुळे गर्भाच्या डोळ्यात मोतीबिंदू तयार होतो, ऐकू न येणे, हृदयात दोष निर्माण होतो. एच आई व्ही विषाणूमुळे गर्भाची वाढ खुंटते. सायटोमेगॅलो जंतूसंसर्गामुळे गर्भाचे डोके लहान राहते, अंधत्व येते आणि बाळ मतिमंद होऊ शकते.
मला वाटते आता तुमच्या लक्षात आले असेलच की सूर्य किंवा चंद्रग्रहणाचा गर्भावर कोणताच वाईट परिणाम होत नाही तर इतर कारणांनी बाळाला जन्मत व्यंग येते.
हे व्यंग कसे टाळता येतील?
गरोदर राहण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच फॉलिक आम्लच्या गोळ्या खाव्यात.
ठराविक जंतुसंसर्ग झाल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी.
नात्यातील लग्नामुळे जनुकीय दोषांचे प्रमाण वाढते.
औषधांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सोनोग्राफीमुळे बहुतेक दोषांचे निदान होते त्यामुळे वेळेवर सोनोग्राफी करणे.
सोनोग्राफीतील मार्कर्स वरून इतर तपासण्या करून निदान करावे.
घातक पदार्थांचे पहिले तीन महिने सेवन टाळावे.
गरोदरपणात क्ष-किरण (x-ray) तपासणी टाळावी.
0 Response to "गर्भवती महिलेने ग्रहण न पाळल्याने खरंच जन्मताच बाळामध्ये व्यंगत्व येते का? वाचा काय आहे वास्तव..."
Post a Comment