सूर्यग्रहण चांगलं की वाईट? ते का होते? कुठे दिसते? आणि कसे पाहावे?

सूर्यग्रहण चांगलं की वाईट? ते का होते? कुठे दिसते? आणि कसे पाहावे?

- श्वेता ढेंबरे

२५ ऑक्टोंबर २०२२ ला सूर्याला ग्रहण लागणार आहे. ग्रहणाबाबत आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. हे सर्व गैरसमज आपल्या अज्ञानामुळे तयार झाले आहेत म्हणूनच आपण ग्रहण म्हणजे काय? सूर्याला किवा चंद्राला ग्रहण का लागते? त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हे समजून घेऊयात. (Solar Eclipse good or bad know all scientific information in Marathi)



अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे. उदाहरणार्थ तुम्ही अनुभवले असेलच की  दुपारी रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाची, इमातींची  रस्त्यावर सावली  पडते. प्रकाश सरळ रेषेत मार्गक्रमण करत असतो, म्हणून सूर्यापासून निघालेली किरणे पृथ्वीवर जमिनीवर पोहचत असताना त्यांच्या वाटेत एखादे झाड किंवा इमारत आल्यास त्याची सावली जमिनीवर पडते. अगदी असंच जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. त्यावेळी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या घटनेला आपण सूर्यग्रहण म्हणतो.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की चंद्र आणि सूर्य सारख्याच आकाराचे आहेत का? याचे उत्तर नाही असे आहे. मग त्यांच्या सावल्या एकाच आकाराच्या कशा काय असतात?

आपल्याला पृथ्वीवरून चंद्र आणि सूर्य सारख्याच आकाराचे वाटले, तरी वास्तवात मात्र तसं नाहीये. व्यक्ती उंच असू की बुटकी, जाड असू की सडपातळ सर्वांना दूरवरच्या वस्तू आकाराने लहानच दिसतात. पृथ्वीपासून सूर्य आणि चंद्र खूपच दूर आहेत  म्हणून आपल्याला पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र लहान दिसतात. 

सूर्य चंद्रापेक्षा आकाराने ४०० पटींनी अधिक मोठा असून ४०० पटींनी दूर आहे. पृथ्वीला सूर्यापेक्षा चंद्र अधिक जवळ आहे म्हणूनच सूर्य आकाराने मोठा असला तरी आपल्याला पृथ्वीवरून दोन्ही सारख्याच आकाराचे दिसतात. तुम्हाला माहिती आहेच की, पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. यामुळेच आपण दिवस - रात्र अनुभवतो. 

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वी आणि चंद्र अंशतः तिरपे होऊन लंबगोलाकार कक्षेत स्वत:भोवती आणि सूर्याभोवती फिरत असतात. यालाच परिभ्रमण म्हणतात. हे परिभ्रमण करत असताना पृथ्वी स्वतः सोबत चंद्राला घेऊन सूर्याच्या कक्षेत प्रवेश करते तेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येतात. अशावेळी जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो तेव्हा चंद्र सूर्याला झाकतो व चंद्राची सावली पृथ्वीवर पडते.

सुर्यग्रहणाचे एकूण तीन प्रकार आहेत. सूर्यग्रहण कधी दिसणार, कुठल्या प्रकारचे दिसणार आणि कुठे दिसणार हे तुम्ही त्यावेळी पृथ्वीवर कुठे आहात यावरून ठरते. 

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार:

१. खग्रास सूर्यग्रहण

२. खंडग्रास सूर्यग्रहण 

३. कंकणाकृती सूर्यग्रहण

(Image Credit : Phases of a solar eclipse : Nasa)

वरील चित्र नीट पाहिल्यास तुम्हाच्या लक्षात येईल की चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये आल्यामुळे दोन प्रकारची सावली पृथ्वीवर पडत आहे. चंद्राचा मध्यभाग सूर्याच्या मध्यापासून निघालेली किरणे अडवतो. त्यामुळे चंद्राच्या मध्याभागाची दाट छाया पृथ्वीवर पडते (वरील चित्रात राखाडी रंगाने दाखवलेली छाया - UMBRA). पृथ्वीच्या ज्या भागावर ही दाट छाया पडते त्यांना खग्रास सूर्यग्रहण दिसते. सूर्याच्या कडांपासून निघणारी सूर्यकिरणे चंद्राच्या कडावरून पृथ्वीवर पडतात त्यामुळे चंद्राची उपछाया पृथ्वीवर पडते. ही उपछाया दाट नसते (वरील चित्रात निळ्या रंगाने दाखलेली छाया - PENUMBRA). पृथ्वीवर ज्या भागावर उपछाया पडते त्या भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. छाया आणि उपछाया कशा तयार होतात हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओमधील प्रयोग पाहू शकता.

व्हिडीओ पाहा -

सूर्यग्रहणाचे प्रकार 

1. खग्रास सूर्यग्रहण: 

चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधून जात असतो त्यावेळी जेव्हा ते तिघेही एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकतो तेव्हा खग्रास ग्रहण दिसते. या ग्रहणात चंद्राच्या कडांबाजूने सूर्याची जी किरणे दिसतात त्याला तेजोलय किरणे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की चंद्र आणि पृथ्वी लंबगोलाकार कक्षेत फिरतात. त्यामुळे कधी चंद्र पृथ्वीच्या जवळच्या बिंदूवर असतो तर कधी तो चंद्राच्या दूरवरच्या बिंदूवर असतो. जेव्हा चंद्र पृथ्वीजवळच्या बिंदूवर असतो तेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो.

खग्रास सूर्यग्रहण (Image Credit)

खग्रास सूर्यग्रहण कसे होते हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. 

२. खंडग्रास सूर्यग्रहण:  

चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जात असताना ते तिघेही संपूर्णपणे एका सरळ रेषेत नसतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून लांबच्या बिंदुजवळ असतो तेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. त्यावेळी चंद्र सूर्याचा काहीसाच भाग झाकतो, या ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 

खंडग्रास सूर्यग्रहण  (Image Credit)

३. कंकणाकृती सूर्यग्रहण: 

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या दूरवरच्या बिंदुजवळ असतो तेव्हा चंद्राचा आकार सूर्याच्या आकारापेक्षा थोडासा लहान असतो म्हणून जेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो तेव्हा तो पूर्णपणे सूर्याला झाकू शकत नाही.  चंद्राचा आकार लहान पडल्यामुळे चंद्रामागे बांगडीच्या आकाराची कडा दिसते. या कडेवरूनच याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे नाव देण्यात आले आहे.  

कंकणाकृती सूर्यग्रहण (Image Credit)

सूर्यग्रहणाबाबतचे समज गैर-समज:

१. राहू केतुमुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते का?

अवकाशात असणारे तारे, चंद्र, पृथ्वी यांना खगोलीय वस्तू म्हणतात. म्हणून सूर्याला आणि चंद्राला लागणारे ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. आता तुम्हाला सूर्यग्रहण हे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे होते याची स्पष्टता आली असेलच. अगदी तसाच पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होते. त्यामुळे राहू केतुमुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते, हा एक गैर-समज आहे.  

२. सूर्यग्रहणात हवा दुषित असते का?

सूर्यग्रहणात हवा दुषित होत नाही त्यामुळे आपण अन्न खाणे, पाणी पिणे, झोपणे या क्रिया केल्याने आपल्याला काहीच अपाय होत नाही. दैनंदिन जीवनात आपण झाडांच्या,  इमारतींच्या सावलीत राहतच असतो जर या सावल्यांनी आपल्याला काहीच हानी पोहोचत नाही तर मग चंद्राच्या सावलीने कसंकाय हानी पोहोचेल?

सूर्यग्रहण पाहताना काय काळजी घ्यावी:

सूर्यापासून अशी काही किरणे पृथ्वीवर पोहोचतात ज्यांनी आपल्याला नुकसान पोहोचते या किरणांना अतिनील किरणे असे म्हणतात. ही  किरणे आपल्या डोळ्यात गेल्यास आपली दृष्टी जाऊ शकते म्हणून सूर्यग्रहण असू किंवा नसू आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे कधीच पाहू नये. सूर्याकडे पाहताना सोलर फिल्टर चष्मा घालावा. त्यामुळे अतिनील किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. काळ्या रंगाचे चष्मे किंवा x-ray फिल्म अतिनील किरणे अडवू शकत नाही म्हणून त्यांचा वापर करू नये.  सोलर फिल्टर डोळ्यांना लावूनही एकाच वेळी ५-१० सेकंदापेक्षा जास्त वेळ सूर्याकडे पाहू नये. थोड्या थोड्या वेळाने सूर्याकडे पाहावे.

(Image Credit)

दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहताना दुर्बिणीला आधी सोलर फिल्टर लावावा मगच त्यामधूनच सूर्याकडे पाहावे. सोलर फिल्टर चष्मा नसेल तर पिन होल कॅमेरा तयार करून त्यामधून सूर्यग्रहण पाहावे. एखाद्या कागदाला होल करून त्या कागदाखाली दुसरा कोरा कागद ठेवावा. होल पाडलेला कागद असा पकडावा की सूर्याचे प्रतिबिंब त्याखाली ठेवलेल्या कोऱ्या कागदावर पडेल. हे सूर्याचे प्रतिबिंब पाहून तुम्ही सूर्यग्रहण पाहू शकता.  

Image credit:

(लेखिकेचं विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण झालं आहे. तसेच त्या सामाजिक क्षेत्रात काम करतात.) 

0 Response to "सूर्यग्रहण चांगलं की वाईट? ते का होते? कुठे दिसते? आणि कसे पाहावे?"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article