असंख्य विवेकी कार्यकर्ते तयार करणे हेच दाभोलकरांच्या खुन्यांना खरे उत्तर - डॉ. बाबुराव गुरव
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश, यांचे खून हे त्यांचे वैयक्तिक खून नसून ते पुरोगामी चळवळीतील समस्त कार्यकर्त्यांचे खून आहेत, या खूनांना खरे उत्तर म्हणजे आपण असंख्य विवेकवादी कार्यकर्ते तयार करणे हेच आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या व जेष्ठ समाजवादी कार्यकर्ते व गडहिंग्लजचे माजी आमदार मा. श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केलेल्या 9 व्या नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. गुरव पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची वैचारिक भूमिका पक्की होती, लोकशाही समाजवादावर त्यांचा विश्वास होता, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर चळवळीचे उत्कृष्ट संघटन उभे केले. दाभोलकरांनी त्यांचे वरील सर्व आरोपांना त्यांचे कृतीतून उत्तरे दिली. दाभोलकरांच्या खूनाला ९ वर्षे झाली तरी या खूनाचा पूर्णपणे उलगडा होवू शकला नाही हे फार दु:खद आहे. असंख्य विवेकवादी कार्यकर्ते तयार करणे हेच दाभोलकरांच्या खुन्यांना खरे उत्तर असेल.
असंख्य विवेकवादी कार्यकर्ते तयार करणे, हेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या खूनांना प्रत्युत्तर आहे.
डॉ. बाबुराव गुरव पुढे म्हणाले की सध्या देशात प्रतिगामी विचारांची लाट आलेली आहे. ती ही थोपवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी चळवळ समृद्ध केली पाहिजे.कटूतेच्या प्रसंगातून बाहेर आले पाहिजे. जनतेचा आवाका, आपला आवाका, आपल्या मर्यादा या गोष्टी समजून घेऊन संवादी पद्धतीने काम वाढवले पाहिजे. सर्व पुरोगामी व्यापक चळवळीशी आपण अधिक घट्टपणे जोडून घेतले पाहिजे.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांनी काही मूल्ये मांडली. ही समानतेची, स्त्रीमुक्तीची, कष्टकऱ्याला चांगले दिवस यावे, अशी मूल्ये होती. आता हर घर तिरंगा हे म्हणत असताना या स्वातंत्र्य सैनिकांच्या मूल्य रुजविण्यासाठी पुढे वाटचाल कशी करावी त्याचा विचार चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.
गडहिंग्लजचे माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, गडहिंग्लज येथील देवदासी विरोधी चळवळीला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी बळ दिले होते. त्यांचे व माझे मित्रत्वाचे संबंध होते.
आपल्या देशात विवेकवादी विचारांची धारा प्राचीन काळापासून आहे, ती पुढे नेण्याचे काम नरेंद्र दाभोलकर यांनी केले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश या पुरोगामी नेत्यांच्या खुनाचा तपास लावण्याची मानसिकता सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. खूनांना काही वर्षे लोटली तरीही स्कॉटलंड यार्डच्या तोडीचे असलेले आपले पोलीस खुन्यांना पकडू शकले नाहीत. शासनाने त्यांना 'तपास करू नये' अशा सूचना दिल्यात काय? असा संतप्त सवाल ही माजी आमदार अॅड. शिंदे यांनी उपस्थित केला.
अॅड. शिंदे पुढे म्हणाले की, दाभोलकरांना नंतर चळवळीच्या वाढीसाठी त्यांचे कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर बळ देणेची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, मी ती घेतली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या स्मृती विशेषांकाचे संपादक राजीव देशपांडे यांनी केल्यानंतर अनिल चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाची सुरुवात शाहिर स्वप्निल शिरसाठ यांनी गीत गायनाने केली तर आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "असंख्य विवेकी कार्यकर्ते तयार करणे हेच दाभोलकरांच्या खुन्यांना खरे उत्तर - डॉ. बाबुराव गुरव"
Post a Comment