बालसंगोपन भाग ३ : तुमची मुलं पाहुण्यांसमोर जास्त हट्ट करतात? पालकांसाठी महत्त्वाच्या ७ गोष्टी...
एरवी मुल जितका हट्ट करत नाही तेवढा हट्ट पाहुणे घरी आले की करतं असं तुमच्या सोबतही होतं का? असं होत असेल तर मुलांच्या हट्टीपणामागे काय कारणं असू शकतात? त्यावर नेमकं काय केलं पाहिजे? चला तर या लेखात बालसंगोपनातील हा भाग समजून घेऊयात...
बऱ्याचदा पाहुणे घरी आले किंवा आईबाबा मुलाला घेऊन पाहुण्यांच्या घरी गेले की मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात. कधीकधी तर आदळआपट आणि जोरदार रडारडही होते. तर कधी 'चल आपल्या घरी', नाहीतर 'त्यांना जायला सांग' असंही मुलं म्हणतात. अशावेळी संकोचायला होते आणि आई-बाबा म्हणून आपण नेमकं काय करायचं हे समजत नाही. केलेलं सर्व नियोजन फिस्कटतं आणि इच्छा नसतानाही मुलांवर ओरडणं होतं, नाहीतर हात तरी उचलला जातो.
बऱ्याचदा अशा परिस्थितीतच मुलांना लेबलिंग देखील केलं जातं. लेबलिंग केलं जातं म्हणजे मुलांसमोर इतरांना सागणं, "हा असाच आहे, नेहमी हट्टीपणा करतो, कुणासोबत बोलू देत नाही, नुस्ता रडत असतो". पण असं करताना आपण प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्नातील गुंतागुंत अधिक वाढवत आहोत. मुलात सुधारणा होण्याच्या दिशेनं न जाता प्रश्न अधिक किचकट बनवत आहोत हे आईबाबांच्या लक्षातही येत नाही.
हे सर्व टाळण्यासाठी काय करावं?
मुलांचा हट्टीपणा आणि त्यातून तयार होणारी परिस्थिती, गुंतागुंत टाळण्यासाठी आई-बाबा आणि घरातील इतर सदस्यांना काही गोष्टी नक्कीच करता येतील. त्यातील काही सोप्या गोष्टी समजून घेऊयात...
१) मुलाला सहभागी करून घ्या
घरात पाहुणे येणार असतील अथवा आपण पाहुणे जाणार असू, तर याची कल्पना आधीच मुलाला द्या. ते पाहुणे आल्यावर आपण काय काय करणार आहोत हेही सांगा. पाहुण्यांसाठी जी तयारी करत आहोत त्यात मुलाचा सहभाग घ्या. जसं की घराची साफ सफाई करणं असेल, जेवण बनवणं असेल, तसंच पाहुणे आल्यावर कोणी काय करायचे आहे हे मुलासमोर ठरवा आणि त्यातील काही छोट्या जबाबदाऱ्या मुलालाही द्या. उदा. पाहुण्यांना पाणी देणं आणि त्याला जमतील अशा छोट्या जबाबदाऱ्या. असं केल्याने आपल्याकडे पाहुणे येणार आहेत आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत हे मुलाला समजते आणि पाहुण्यांबद्दल आपलेपणा, आदर निर्माण होतो.
२) मुलामधील चांगल्या गोष्टींवर बोला
पाहुणे घरी आल्यावर अथवा तुम्ही पाहुणे गेल्यावर सर्वांना मुलाची ओळख करून द्या. सोबतच तो काय चांगलं करतो हेही सांगा. यातून मुलाला त्याचा आत्मसन्मान मिळतो आणि आपण जबाबदार माणून आहोत ही भावना मुलात रूजते. एकदा जबाबदारीची भावना मुलात आली की, आपण आत्ता हट्ट करून चालणार नाही हे मुलाला उमगते. पण हे करत असताना एक गोष्ट आवर्जून पाळायला हवी, ती म्हणजे मुलाचे गुण सांगताना लगेलच त्याला दाखव बरं गाणं म्हणून, दाखव बरं नाचून असं सांगू नका. अनोळखी अथवा नवीन माणसांसमोर मुलाला ओशाळल्यासारखं होतं.
३) मुलांशी बोला
जेव्हा घरातील मोठे व्यक्ती गप्पा मारत असतात, तेव्हा त्यात मुलाचा सहभाग नसतो. अशा वेळी मुल तुमचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या कृती करत असतं. अशा वेळी थोडा वेळ मुलासोबत बोलून आता तू थोडावेळ खेळ, मग पुन्हा ये आपण गप्पा मारूया असं मुलाला सांगा. त्यामुळे मुलाला आईबाबांचे लक्षही मिळतं आणि आपण काय करायचं आहे हे देखील कळतं.
४) पाहुण्या मुलांसोबत तुलना नको
पाहुण्यांसोबत लहान मुल असेल तर त्या दोघांमध्ये तुलना न करता त्या दोघांच्याही चांगल्या गोष्टींची स्तूती करा. ज्या कमतरता असतील त्या गोष्टी आम्ही आता शिकत आहोत असं सांगून तिथेच सोडा. कारण त्या दोन मुलांमध्ये तुलना झाली, तर मुलात न्युनगंडांची भावना येऊ शकते. आपल्या आईबाबांना आपण आवडत नाही असं वाटू शकतं. त्यामुळे दुसऱ्या मुलासोबत मैत्री करून खेळण्यापेक्षा तिरस्काराची भावना बळावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
५) हट्ट केला तरी नियमावर ठाम राहा
बहुतेक वेळी पाहुणे घरी आल्यावर आई-बाबा आपल्याला हवं ते करू देतील म्हणून मुलं हट्टीपणा करतात. मुलं हुशार असतात. केव्हा काय करायचं हे त्यांना माहीत असतं. बरोबर त्यावेळी मुलं मला चॉकलेट दे, मी टीव्ही बघते, मोबाईल घेतो असा हट्ट करतात. बऱ्याचदा आपणही आपली सोय म्हणून मलांना हवं ते करू देतो. हे टाळायचं असेल तर ठामपणे “आता टीव्ही, मोबाईल बघायचा नाहीये” हे सांगायला हवं.
कितीही वेळा मुलाने विचारलं तरी आपण डोकं शांत ठेवून नाही म्हणायला हवं. ३-४ वेळा असे प्रसंग घडल्यावर मुलाच्या लक्षात येईल की आई बाबा ठरलेले नियम पाळतात. आई-बाबा ज्या गोष्टींना नाही म्हणतात त्याला कोणत्याही परिस्थितीत नाहीच म्हणतात. त्यामुळे आपण रडून, हट्ट करून फायदा नाही, हे मुलांना कळतं.
६) काय चुकीचं घडलं हे सांगा
एवढं सगळं करूनही कधी कधी मुलं हट्टीपणा करतातच. अशा वेळी न चिडता शांत राहून घरी गेल्यावर अथवा पाहुणे गेल्यावर मुलाशी झालेल्या प्रकाराबद्दल शांतपणे बोलायला हवं. तू हट्टीपणा केल्यामुळे पाहुण्यांना आपल्यासोबत व्यवस्थित बोलता आलं नाही. त्यामुळे ते नाराज झालेत हे मुलाच्या लक्षात आणून द्यायला हवं. तसंच तू असं केलेलं मला अजिबात आवडलेलं नाही हे मुलापर्यंत पोहचवायला हवं. मुलासोबत व्यवस्थित बोलून पुढच्यावेळी असं करणार नाही याबद्दल त्याची हमी घ्यावी.
७) हट्टीपणा कोण करतं हे ठरवा
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा. हट्ट मुलं करत आहेत की आई बाबा म्हणून आपण करत आहोत हे तपासायला हवं. कधी कधी आपण मुलाला एखादी गोष्ट करू नको म्हणतो आणि मुलाच्या दृष्टीने ती करणं महत्वाचं असतं. अशा वेळी मी मोठा आहे, मी नाही म्हणूनही माझं ऐकत नाही हे आपल्याला सहन होत नाही किंवा उगीच काम वाढेल म्हणून नाही म्हणतो. मी नाही म्हणालो/ म्हणाले म्हणून त्याने ती गोष्ट करूच नये असं तर होत नाहीये ना हे तपासायला हवं. आपण मुलांपेक्षा खूप कमी हट्टी असायला हवं. मुलांच्या विकासाच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सर्व गोष्टी आपण त्यांना करू द्यायला हव्यात.
0 Response to "बालसंगोपन भाग ३ : तुमची मुलं पाहुण्यांसमोर जास्त हट्ट करतात? पालकांसाठी महत्त्वाच्या ७ गोष्टी..."
Post a Comment