बालसंगोपन भाग २ : मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय करावं?

बालसंगोपन भाग २ : मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय करावं?



आजच्या काळात ज्या ज्या घरात लहान मुलं आहे त्या प्रत्येक घरात मोबाईलचा अती वापर ही समस्या सर्रास बघण्यास मिळते. मुल मोबाईलशिवाय रहात नाही, जेवत नाही, झोपत नाही ही तक्रार ऐकण्यास येतेच. काही घरांमध्ये जरा उलटं चित्रही पाहण्यास मिळतं त्यांचं म्हणणं असतं की आमचं मुल जास्त मोबाईल बघत नाही, पण जेवणाच्या वेळी आणि झोपण्याच्या वेळी त्याला मोबाईल लागतोच. मात्र, ही गोष्ट अजिबात अभिमानाने सांगण्याची नाही हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. तुमचं मुल मोबाईल शिवाय जेवू शकत नाही, झोपू शकत नाही याचा अर्थ त्याला मोबाईलचे व्यसन लागलं आहे अथवा लागण्यास सुरुवात झाली आहे हे समजून घ्यायला हवं.

मोबाईलच्या अती वापरामुळे लहान वयातच मुलांमध्ये वेगवेगळे आजार बघण्यास मिळत आहे जसं की, लठ्ठपणा, आक्रमकपणा (अग्रेसीवनेस), चिडचिड, कमी झोप, कमी जेवण अशा अनेक आजारांना मुलांना सामोरं जावं लागत आहे. मोबाईलमध्ये मुलं कल्पनारम्य जगातील काहीतरी बघत असतात ज्याचा त्यांच्या वास्तविक जगण्याशी काही संबंध नसतो आणि हळूहळू मुलं काल्पनिक जगात जगू लागतात. यामुळं मुलं त्यांचे आई वडील, घरातील इतर लोक आणि समाजापासून दूर जावू लागतात. जेव्हा वास्तवाचं भान येतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो. हे सर्व टाळण्यासाठी पालक म्हणून आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या लागतील, तर काही गोष्टी प्रकर्षाने स्वतः कराव्या लागतील. चला तर यावर नेमक काय करता येईल याचा आढावा घेऊयात...

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय करावं?

१) दिवसातून काही वेळ तरी मुलांना मैदानावरील खेळ खेळण्यास द्यावे. त्यामुळे व्यायाम होतो आणि मुलांचा शारीरिक आणि भावनिक विकासही व्यवस्थित होतो. 

२) समवयीन मुलांसोबत जास्तीत जास्त खेळू द्यावं. त्यामुळं मुलांचा सामाजिक विकास चांगला होण्यास मदत होते. तसंच इतरांना समजून घेणं, आपल्यात सामावून घेणं, वस्तू, खाऊ वाटून घेणं याची समज मुलांमध्ये विकसित होण्यास मदत होते. 

३) बैठे खेळ खेळताना कागदकाम, चित्र काढणं, रंग काम, तोडो जोडो सारखे खेळ मुलांसोबत खेळावे. जेणे करून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि आपण काहीतरी नाविन्यपूर्ण बनवलं याचा आनंदही मुलांना मिळतो. 

४) दिवसातील काही वेळ गोष्टींसाठी राखून ठेवायला हवा. ज्या वेळेत मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवता येतील, तोंडी गोष्टी सांगता येतील आणि मुलांना स्वतः वाचता येत असेल, तर ते स्वतःही गोष्टी वाचू शकतील. साधारण जेवणाच्या वेळी मुलांना तोंडी गोष्ट सांगणं, गाणं म्हणणं अथवा गप्पा मारणं अशा कृती करू शकता. झोपण्यापूर्वी गोष्ट वाचणं किंवा गोष्ट ऐकणं मुलांना छान वाटतं आणि त्यामुळे मोबाईलची आठवणही येत नाही. 

५) घरात काही नियम बनवून ते १०० टक्के पाळावे. मुलांसमोर मोबाईल फोन फक्त कामापूरता वापरावा. (केवळ फोनवर बोलण्यासाठी) यूट्यूब, इंटरनेट, फिल्म बघणे हे टाळावे म्हणजे मुलाची मोबाईलला घेऊन उत्सुकता जास्त वाढत नाही. घरात येणाऱ्या इतर व्यक्तींनी देखील हा नियम पाळायला हवा.

६) तुमचं बाळ ३ वर्षाच्या आतील असेल, तर त्याचा स्क्रिन टाईम अगदी शून्य असायला हवा. 

७) तुमचं मुल ३ ते ६ वर्ष वयोगटातील असेल, तर स्क्रिन टाईम दिवसभरात जास्तीत जास्त २ तास असावा. कमी असल्यास अतीउत्तम. मुलाचा स्क्रीन टाईमसाठी मोबाईल वापरण्यापेक्षा टीव्ही वापरण्यास प्राधान्य द्यावे. कारण टिव्हीवरील चित्र मोठं दिसतं आणि टीव्ही डोळ्यांपासून दूर असल्याने डोळ्यांवर त्याचा कमी ताण येतो. 

आईबाबा झाल्यावर मुलांसाठी आपल्याला आवर्जून वेळ काढावा लागतो. तो काढला आणि आपल्या मुलासाठी आपल्याला नेमकं काय करायचं हे एकदा उमगलं की बाळाचं बाळपण त्याच्याबरोबर लहान होऊन आपल्यालाही उपभोगता येतं. चला तर मग यापैकी काही गोष्टी कृतीत आणण्याचा प्रयत्न करुयात. यातील काही गोष्टींचा तुम्हाला उपयोग झाल्यास नक्की कळवा आणि आणखी कोणत्या विषयाबाबत तुम्हाला वाचायला आवडेल हेही सूचवा.

धन्यवाद.

- प्रियंका सोनवणे

(लेखिका बालविकास व पालकत्व या क्षेत्रात कार्यरत आहेत)

0 Response to "बालसंगोपन भाग २ : मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी काय करावं?"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article