बालसंगोपन भाग १ : तुमचंही मुल व्यवस्थित जेवण करत नाही का? पालकांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी...
बऱ्याच पालकांची रोजची तक्रार असते की त्यांची मुलं व्यवस्थित जेवणच करत नाही. काय करावं हेच समजत नाही. जर मुल व्यवस्थित जेवण करणार नाही, तर त्याचा सर्वांगीण विकास होणार नाही आणि मुल चिडचिडं बनेल. मुलांनी व्यवस्थित जेवण करावे यासाठी आपण प्रयत्न करतो, पण ते सारे प्रयत्न मुलांवरच करतो. आपण पालक म्हणून आधी स्वतःलाही काही सवयी जाणीवपूर्वक लावाव्या लागतील. म्हणजे मुलांना आपल्याला जेवणाच्या सवयी व्यवस्थित लावता येईल. चला तर मुलांनी जेवण व्यवस्थित करावे यासाठी काही टीप्स समजून घेऊयात. याचा वापर करून मुलांच्या दैनंदिन जेवणाच्या सवयींमध्ये चांगले बदल करता येतील.
पालक म्हणून स्वतःला कोणत्या सवयी लावाव्या?
मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये परिपूर्ण आहाराची भूमिका महत्वाची असते. जर मुलांनी व्यवस्थित व वेळच्या वेळी जेवण केले तर त्यांचा बाकीचा दिनक्रम व्यवस्थित चालतो. बऱ्याचदा मुलं अनेक पदार्थ खात नाही. मला आवडत नाही असं म्हणून खाणं टाळतात, पण मुलांनी असं केलं तर त्यांना चौरस आहार मिळणार कसा? मुलांनी व्यवस्थित जेवण करावं, चौरस आहार घ्यावा यासाठी पालकांना स्वतःला काही सवयी लावाव्या लागतील.
तुम्हाला माहितच असेल, की घरातील मोठे लोक जे करताता ते सर्व लहान मुलं करत असतात. उदा. तुम्ही जर खोकला तर मुल त्याची नक्कल करतं. घरात म्हातारे लोक असतील आणि ते वाकून चालत असतील तर मुलंही तसं चालतात. अशाच प्रकारे रोजच्या जीवनातही मुलं मोठ्या माणसांच्या नकला करत असतात. जर तुम्हीच घरात जेवणाच्या वेळा पाळत नसाल, तुम्हाला स्वतःलाच बऱ्याच गोष्टी आवडत नसतील, तर मुलंही तुमचं पाहून शिकतात. मला आवडत नाही हा शब्द मुलं कोठे शिकतं? तर मुलं हे सगळं घरात बघत असतात आणि तेथूनच मुलांना समजते की मोठे लोकच खात नाही, तर आपणही नाही खाल्लं तरी चालेल. म्हणून मुलांना सवय लावण्यापूर्वी आपल्याला पालक म्हणून स्वतःला काही सवयी लावाव्या लागतील.
मुल जेवायला बसते, पण पोटभर जेवण का करत नाही?
मुलं जेवण करताने जर खूप शांत वातावरणात जेवण करत असेल तर थोडं खाल्यावर लगेच ‘झालं माझं जेवण’ असं म्हणू शकते. हे टाळण्यासाठी मुलाला जेवण भरवतांना खालील गोष्टी करता येतील...
१) मुलं जेवण करत असताना तुम्हाला येत असेलेली गोष्ट मुलाला सांगा. गोष्ट ऐकण्यात मुल दंग होते आणि गोष्टीची मजा घेत पोटभर जेवण कधी होते हे मुलालाही कळत नाही. पण गोष्ट ही पालकांनी गप्पा मारत सांगावी आणि त्यात मुलाचा सहभाग देखील आवश्य घ्यावा. उदा. एक होती चिऊ आणि एक होता काऊ ही गोष्ट जर तुम्ही सांगणार असाल तर गोष्ट यांत्रिकपणे न सांगता मुलाचा सहभाग घेत सांगावी. जसे तू चिऊ पाहिली आहे का? चिऊचा आवाज कसा असतो? अशा प्रकारे गोष्ट पूढे न्यावी. म्हणजे मुलांना गोष्टीची मजा येते.
२) घरात लहान मुलं असताना गोष्टीची पुस्तकं घरामध्ये अवश्य असावी. जेवण भरवताना एखादी गोष्ट वाचून दाखवली, तर मुलांना मजा येते आणि मस्त जेवण होतं.
३) मुलाला जेवण भरवताना घरात उपलब्ध असलेले वेगवेगळे चित्रं दाखवावे आणि त्या चित्राबद्दल गप्पा माराव्यात.
खाद्य पदार्थांमधील विविधता किती महत्त्वाची?
सारख्याच चवीचं तेच तेच जेवण जेवून आपल्याला देखील कंटाळा येतो आणि जेवण करावसं वाटत नाही. हेच मुलांसोबतही होऊ शकतं. त्यासाठी जेवणात विविधता आणणं गरजेचं असतं. म्हणजे रोज वेगवेगळे पदार्थ बनवा असं नाही, पण आहे तेच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवता आले पाहिजेत. म्हणजे चव बदलते आणि खाण्यात मजा येते.
उदा. मुलांना अंडी देत असाल तर त्याचे वेगवेगळे प्रकार करता येतील. जसे उकडलेले अंडे फक्त मिठ टाकून, उकडलेलं अंडं थोडं फ्राय करून, अंड्याचं ऑम्लेट, अंड्याची भुर्जी, अंडा रोल, अंडा मॅगी असे वेगवेगळे प्रकार बनवता येऊ शकतात. आत्ता तर यूट्यूबच्या मदतीने तुम्ही पदार्थांचे अनेक प्रकार घरबसल्या शिकू शकता.
मुलांना घरातील मोठ्यांसोबत पंगतीत जेवायला द्या
घरात मुलांना आधी जेवण देऊया आणि मग बाकी मोठे लोक निवांत जेवण करू असा समज बऱ्याच घरांमध्ये असतो. पण मुलांना मोठ्या व्यक्तींसोबत पंगतीत बसून जेवण करायला जास्त आवडते. मुलांना बऱ्याचदा लहान आहे म्हणून छोट्या ताटात जेवायला दिले जाते. बाकी सर्व लोक मोठ्या ताटात जेवतात आणि मुलाला लहान ताटात जेवायला दिले तर मुलं हा फरक लगेच ओळखतात.
बाकी सर्वांच्या ताटात जेवणासाठी जास्त पदार्थ आणि आपल्याच ताटात कमी पदार्थ दिसत असले तर मुलाला त्याचे वाईट वाटते. हे कसं सांगायचं हे त्याला माहित नसल्याने त्याला ते तुमच्यापर्यंत पोहचवता येत नाही. मात्र, त्याचा परिणाम मुलांच्या जेवणावर होतो. मुलांनाही तेवढेच वाईट वाटते जेवढे एकाच पंगतीत जेवताने आपल्यासोबत भेदभाव झाल्यावर मोठ्या व्यक्तींना वाटते. म्हणून घरातील मोठ्यांच्या पंगतीत मुलांना मोठ्यांप्रामाणेच जेवण द्यायला हवे. फक्त मुलांचा आहार कमी असल्याने वाढण्याचे प्रमाण कमी असायला हवे.
मुलांसोबत योग्य 'डिल' करा
मुलांनी चॉकलेट, कुरकुरे आणि तत्सम पदार्थ खाणे तब्येतीसाठी हानीकारकच असतात. ते मुलांनी खाऊ नये यासाठी प्रयत्न करायलाच हवेत, पण आपल्या आजूबाजूला या सर्व गोष्टींचा एवढा भडीमार आहे की मुलांना या सर्वांपासून बाजूला ठेवणं तसं अवघड आहे. हे सर्व पदार्थ मुलांना देताना कमी प्रमाणात आणि योग्य डिल करून द्यायला हवेत. या सर्व पदार्थांचा उपयोग मुलांचे जेवण व्यवस्थित होण्यासाठी करता येऊ शकेल.
उदा. मुलांना जर चॉकलेट हवं असेल तर जेवण (जेवण म्हणजे किती हे देखील सांगा. उदा. १ चपाती आणि भाजी खाल्ली की चॉकलेटचा एक तुकडा देईल) झाल्यावर एक तुकडा देईल असे सांगून जेवणानंतर ठरवल्या प्रमाणे चॉकलेट द्या. जर मुलाने ठरल्याप्रमाणे म्हणजे डिलप्रमाणे जेवण केलं नाही, तर चॉकलेट देऊ नका. म्हणजे पुढील वेळी मुल हे लक्षात ठेवते.
गरज पडल्यास डॉक्टरांची मदत घ्या
वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करूनही मुलं जेवण करत नाही अथवा खाल्लेले जेवण पचवायला त्रास होतो असे होत असल्यास डॉक्टरांच्या मदतीची गरज असू शकते. अशा वेळी डॉक्टरांना भेटून सल्ला घेणे गरजेचे असते.
मुलांच्या जेवणाच्या सवयी विकसित करण्यासाठी वरील गोष्टींचा उपयोग होईल. परंतू हे करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे मुलांच्या जेवणाच्या सवयी विकसित करणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस केले आणि झाले असे होत नाही. या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे.
- प्रियंका सोनवणे (लेखिका बालविकास आणि पालकत्व या क्षेत्रात कार्यरत आहेत)
पालक आणि पालक होऊ पाहणाऱ्या दाम्पत्यासाठी दिशादर्शक माहिती.
ReplyDelete