बालसंगोपन लेखमाला कशासाठी? वाचा...
आपलं मुल आणि त्याचे संगोपन हा अनेक पालकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनत चालला आहे. लहान मुल घरात असताना पालकांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात, पण हे प्रश्न कसे सोडवायचे हे बऱ्याचदा उमजत नाही.
कधी मुलं जेवणच करत नाही, थोडा वेळही शांत बसत नाही, सारखा मोबाईल मागते, टिव्हीवर कार्टून्स लावून दिले नाही, तर रडते किंवा आरडाओरडा करते, सारखे चिडचिड करत असते, अभ्यास करायला नको म्हणते हे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात.
खरंतर या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर नाही. प्रत्येक मुल वेगळं असतं, त्याच्या घरची, आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे प्रश्न जरी सारखे असले, तरी त्या प्रश्नांचे एक उत्तर किंवा एक उपाय नाही. जो उपाय केला की प्रश्न सुटला.
मुलांसंदर्भात असणाऱ्या प्रश्नांना उपाय म्हणजे प्रश्न समजून घेणं आणि त्यावरील उपायांची मालिका बनवणं आणि त्यात सातत्य ठेवणं. तसेच ही प्रक्रिया म्हणजे सतत करून पहाणं आणि उपयोग नाही होत असं वाटलं तर काही बदल करत प्रक्रिया सुरू ठेवणं.
लहान मुलांमध्ये प्रचंड उर्जा असते, त्यांना सतत काही ना काही करून पहायचं असतं आणि त्यातून घरातील मोठ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. मुलांना व्यस्त कसं ठेवायचं हे समजत नाही आणि मुलांच्या भविष्याची काळजी सतावण्यास सुरवात करते. त्यातूनच कधीतरी जाणते अजाणतेपणी पालकांकडून मुलांवर अनेक निर्बध लादण्यास सुरुवात केली जाते. मुलांना मात्र कोणत्याही प्रकारच्या निर्बंधामध्ये जगायला आवडत नाही आणि यातून प्रश्न कमी होण्यापेक्षा वाढण्यास सुरुवात होते.
आपण या लेखमालेतून अशा प्रश्नांवर उहापोह करणार आहोत. मुलांना कोणत्या प्रकारचे कृती कार्यक्रम देता येतील ज्यातून पालकांची ही काळजी कमी होण्यास मदत होईल आणि मुलांमध्ये असणाऱ्या उर्जेचा योग्य वापर करून त्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल.
- प्रियंका सोनवणे (लेखिका मागील ६ वर्षांपासून बालसंगोपन क्षेत्रात कार्यरत आहेत.)
(टीप - १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरू झालेल्या या लेखमाले अंतर्गत पालकांना मुलांसंदर्भात जाणवणाऱ्या एका प्रश्नावर सविस्तर चर्चा होईल आणि पालकांना मुलांबाबत वापरता येतील अशा काही उपाययोजनाही सुचवल्या जातील.)
0 Response to "बालसंगोपन लेखमाला कशासाठी? वाचा..."
Post a Comment