"जयंत पाटील तुमचा जलसंपदा विभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतोय?"
जयंत पाटील तुमचा जलसंपदा विभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतोय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवाआघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल यांनी केलाय. (SSS Ranjit Bagal criticize Jayant Patil over Beed farmer women compensation)
रणजित बागल म्हणाले, "बीड जिल्ह्य़ातील पाली या गावातील तारामती अर्जुन साळुंखे न्याय मागण्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन दिवसापासुन आमरण उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचं हे आमरण उपोषण स्मशानभूमीत सुरू आहे. जलसंपदा विभागाने अर्जुन साळुंखे यांची जमीन संपादित करून घेतली मात्र त्या भुसंपादनाचा मोबदला मात्र दुसऱ्याच व्यक्तीला दिला. यामध्ये मोठं काळंबेरं झालं."
"गरीब साळुंखेना ना रक्कम मिळाली, ना जमीन. यामुळेच त्यांनी दीडदोन वर्षांपूर्वी आत्मदहन केले. त्यात ते मरण पावले. याआधी त्यांच्या मातोश्री देखील शासनदरबारी खेटे घालुनच मरण पावल्या. एवढे दोन बळी घेऊनही प्रशासन गेंड्याच्या कातडीप्रमाणेच वागले. गेले २० वर्षांपासून या कुटुंबाला आपला जलसंपदा विभाग मोबदला देवू शकला नाही," असं रणजित बागल यांनी म्हटलं.
रणजित बागल पुढे म्हणाले, "म्हणूनच गेल्या आठ दहा दिवसांपासून तारामती साळुंखे उपोषणाला बसूनही पाटबंधारे विभाग व जलसंपदा प्रशासन भानावर यायला तयार नाही. एखादी महिला स्मशानभूमीत उपोषणास बसली आहे ही पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिने अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे स्वतःला कार्यतत्पर व सुसंस्कृत नेते म्हणवून घेत असतील तर त्यांनी आपली कार्यतत्परता एका महिलेचा जीव जाण्याच्या आत दाखवावी."
"पीडित महिलेला भूसंपादन रक्कम व भूसंपादन झालेपासून त्या रकमेचे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घ्यावा व त्यांचे मृत पती अर्जुन साळुंखे यांच्या मृत्युसाठी कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची देखील तातडीने हकालपट्टी करावी आणि त्या महिलेला न्याय द्यावा. अन्यथा एका शेतकरी महिला भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरेल," असा इशारा बागल यांनी दिलाय.
SSS Ranjit Bagal criticize Jayant Patil over Beed farmer women compensation
0 Response to ""जयंत पाटील तुमचा जलसंपदा विभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतोय?""
Post a Comment